सरितादेवीला अखेर एशियन गेम्स मेडल प्रदान

sarita
दिल्ली – कोरियात पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये मुष्टीयुद्धात वादग्रस्त परिस्थितीत मिळालेले ब्राँझ पदक स्वीकारण्यास नकार दिलेल्या भारताच्या मणिपुरी बॉक्सर सरितादेवीला अखेर हे ब्राँझ पदक दिल्लीत बुधवारी प्रदान करण्यात आले. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी हे पदक सरितादेवीला भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यालयात प्रदान केले.

कोरियात पार पडलेल्या १७ व्या आशियाई स्पर्धात सरितादेवीने ६० किलो वजन गटात सहभाग घेतला होता. मात्र एका वादग्रस्त निर्णयामुळे तिला ब्राँझ पदक देण्यात आले होते. अन्याय झाल्याचे सांगून तिने हे पदक स्वीकारण्यास नकार दिला होता. तिच्या या वर्तनामुळे आंतरराष्ट्रीय बॉकिसंग फेडरेशनने तिच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सरितादेवीची पार्श्वभूमी चांगली असून आजपर्यंतची तिची वर्तणूकही चांगली असल्याने तिच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी असे पत्र फेडरेशनला दिले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही सरितादेवीला समर्थन दिले होते. त्यानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेनेही तिची पाठराखण केली आणि हे पदक तिला दिले गेले असे समजते.

Leave a Comment