सरकारला कैद्यांनी मिळवून दिले २ कोटी रुपयांचे उत्पन्न

yerwada
पुणे – राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगणा-या कैद्यांनी शिक्षेच्या कालवधीत कारागृहातील विविध उद्योगात कामे करून मागील पाच वर्षांत सरकारला जवळपास दोन कोटी रुपयाचे उत्पन्न मिळवून दिले आहे. तर, हाती मिळालेल्या कामाच्या बदल्यात कैद्यांना वेतन दिले जाते; यातून कैद्यांचे पुनर्वसनास मदत होणार असून कारागृहाचा मुख्य उद्देश सफल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील येरवडा, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक रोड, कोल्हापूर या सात मध्यवर्ती; तर अकोला, धुळे, येरवडा आणि पैठण खुली अशी एकूण अकरा कारागृहाच्या ठिकाणी कारखाना उद्योग आहेत. या उद्योगात कैद्यांना वस्त्रोद्योग, सुतारकाम, शिवणकाम, लोहारकाम, चार्मकला, बेकरी, धोबीकाम, रंगकाम, कागद कारखाना, मोटार वॉशिंग सेंटर, रसायन अशा एकूण बारा प्रकारच्या उद्योगात कामे करावी लागतात. उद्योगात कामे करताना कैद्यांच्या कामाचे ज्ञान पहिले जाते. अकुशल, अर्धकुशल आणि कुशल असे तीन प्रकार ठरविले जातात आणि त्यानुसार त्यांना वेतन दिले जाते. वरील सर्व उद्योगातून तयार झालेल्या मालाच्या विक्रीतून सरकारला दर वर्षी सरासरी चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

Leave a Comment