देशात २५ सौर उर्जा पार्कना परवानगी

saur
दिल्ली – देशभरात सौर उर्जा क्रांती घडविण्याचा मार्ग कॅबिनेटने सौर ऊर्जा पार्क उभारण्यास दिलेल्या मंजुरीमुळे मोकळा झाला असून या योजनेअंतर्गत देशभरात २५ सौर उर्जा पार्क आणि अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट येत्या पाच वर्षात उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांतून १ लाख मेगावॉट वीज निर्मितीचे उदिष्य्य समोर ठेवले गेले आहे. सर्व पार्कची वीज निर्मिती क्षमता ५०० मेगावॉटपेक्षाही अधिक असेल असे समजते. यासाठी कायद्यात कांही बदल करण्यासची कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

कायदे बदलात प्रामुख्याने वीज चोरी शिक्षा नियम अधिक कडक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते. ही सौर ऊर्जा पार्क कार्यान्वित झाली की देशाची वीज उत्पादन क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्राकडून ४०५० कोटी रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पांत राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात कुठे, कोणती कंपनी ही पार्क उभारणार हे ठरविण्यासाठी राज्य सरकारांनी एजन्सी नियुक्त करायची आहे. त्यासाठी केंद्र २५ लाख रूपये देणार असून या एजन्सीने त्यांचा अहवाल ६० दिवसांत सादर करावयाचा आहे.

या सौर उर्जा पार्कमुळे राज्यातील मागास भागांचा विकास होण्यास मदत होणार आहे. जेथे जमिनींचे भाव अगदी कमी आहेत, त्या जागात हे प्रकल्प उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे कारण महाग जमिनी खरेदी करून तेथे ही पार्क उभारणे हे खर्चाचे काम ठरेल असेही सांगितले जात आहे. हे प्रकल्प पाच वर्षात कार्यान्वित झाले तर भारत जगातले सर्वात मोठे सौर उर्जा केंद्र बनेल असेही समजते.

Leave a Comment