कारगिल युद्ध बांगलादेश निर्मिती केल्याचा बदला म्हणून!

mushraf
कराची – पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी क्षेत्र कोणतेही असो, जशास तसे उत्तर देण्याचे माझे धोरण आहे, भारताने बांगलादेशच्या निर्मितीत जी भूमिका बजावली होती त्याचा बदला म्हणून आम्ही भारतावर कारगिल युद्ध थोपले होते, अशा मुजोर शब्दात कारगिलमधील पाकी सैनिकांच्या घुसखोरीचे समर्थन केले.

मुशर्रफ यांनी आपले सैनिक आणि या देशात आश्रयात असलेल्या अतिरेक्यांना कारगिलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या काळात १९९९ मध्ये पाठविले होते. आपल्या या कृतीचे समर्थन करताना ७१ वर्षीय मुशर्रफ एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की, भारताने बांगलादेशची निर्मिती तर केलीच, शिवाय सियाचीनवर ताबा मिळविण्याचाही प्रयत्न केला होता. जशास तसे उत्तर देण्याचे माझे धोरणच असल्याने पाकची सत्ता स्वीकारताच मी भारताविरोधात अनेक मोहिमा हाती घेतल्या. कारगिल हे त्यापैकी मोठे धाडस होते.

मायभूमीत देशद्रोहाचा खटला दाखल असतानाही आपली मुजोरी कायम ठेवताना, मुशर्रफांनी पाकला भारतासोबत मैत्री करताना सावधानतेचा सल्ला दिला. समान अटींवरच भारतासोबत मैत्री शक्य होऊ शकते. दोन्ही देशांनी एकमेकांचा आदर करण्याची गरज आहे. भारत मैत्रीच्या दिशेने एक पाऊल उचलत असेल, तर पाक दोन पावले पुढे येईल. लोक म्हणतात की, मला भारतासोबत मैत्री मान्य नाही. पण, हे खरे नाही. माझ्या काळात भारतासोबतचे संबंध फार चांगले होते. काश्मीर, सर क्रीक आणि जल करार यासारखे वाद सोडविण्यासाठी आम्ही एकमेकांच्या फार जवळ आलो होतो, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment