इबोलाविरोधात लढणारे डॉक्टर्स पर्सन ऑफ द इयर

time
जीवघेण्या इबोला साथीविरोधात प्राणांची पर्वा न करता रूग्णांवर उपचार करणारे असंख्य डॉक्टर्स, नर्सेस यांची यंदाच्या टाईमच्या मासिकाच्या २०१४ वर्षासाठीच्या पर्सन ऑफ द इयर साठी निवड करण्यात आली आहे. या साथीविरोधात लढा देताना या सेवकांनी केलेले अथक परिश्रम, दाखविलेले धैर्य आणि दयाबुद्धीसाठी त्यांची निवड केली गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता आणि त्याग करून त्यांनी रूग्णांवर उपचार केले आणि अनेकांचे प्राण वाचविले असेही यात नमूद करण्यात आले आहे.

या टायटलसाठी जगभरातील ५० जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात अनेक राजकीय नेते, उद्योजक, कलाकारांचा समावेश होता. हा पुरस्कार या मासिकातर्फे १९२० सालापासून देण्यात येतो. जगावर संबंधित वर्षात चांगल्या वा वाईट दोन्ही अर्थाने प्रभाव पाडणार्‍या व्यक्तीला तो दिला जातो. या संदर्भात मासिकाच्या संपादक नॅन्सी गिब्ज म्हणाल्या की यंदाच्या पुरस्कारासाठी इबोला विरोधात लढा देणार्‍या आरोग्य सेवकांची निवड ही अतिशय योग्य आहे. प. आफ्रिकेत ही साथ दरवर्षीच येते मात्र यंदाचे तिचे स्वरूप अत्यंत भयकारी होते. मात्र रूग्णांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर्स नर्सेस आणि अन्य आरोग्य सेवकांनी देशांच्या सीमांची बंधने न मानता आणि स्थलकालाचा विचार न करता अथक काम केले आणि रूग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. यात अनेक डॉक्टर्स नर्ससना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे.

याच मासिकाने पर्सन ऑफ द इयर या टायटलसाठी योग्य व्यक्ती कोण यासाठी वेगळा ऑनलाईन पोलही घेतला होता. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांना ५० लाख मते मिळाली आहेत.

Leave a Comment