नागपूर – महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी सर्व गावकर्यांतच्या संमतीने जागा पसंत करुन तिथे गावाचे पुनर्वसन केले जाईल. त्यानंतर पुनर्वसन कायद्यानुसार या गावाला १८ नागरी सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले आहे.
माळीण गावाचे पुनर्वसन गावकऱ्यांच्या संमतीने – एकनाथ खडसे
माळीण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मुख्यमंत्री सहायता, पंतप्रधान सहायता आणि राष्ट्रीय कुटुंब सहायता तसेच आम आदमी योजनेअंतर्गत अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. बाधितांना कपडे, घरगुती भांडी खरेदीसाठी तसेच मृत जनावरांच्या मालक आणि जखमी व्यक्तिंना अनुदान वाटप करण्यात आले आहे. शेतकरी अपघात विमा योजना तसेच राजीव गांधी शालेय विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत अनुदान वाटपाची कार्यवाही प्रगती पथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.