म्हाडाच्या सोडतीत गिरणी कामगार अजूनही उपेक्षित

mhada
मुंबई – म्हाडाने गिरणी कामगारांसाठी सोडत काढून अडीच वर्षे उलटली; मात्र अद्यापही २६० विजेत्यांचा ठावठिकाणा म्हाडाला सापडलेला नाही. अनेकदा आवाहन करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने म्हाडा या कामगारांचा शोध थांबवण्याची शक्यता आहे. जून २०१२ मध्ये म्हाडाने पहिल्या टप्प्यात सहा हजार ९२५ घरांसाठी सोडत प्रक्रिया पूर्ण केली. म्हाडाने बँकेद्वारे राबवलेल्या नोंदणी मोहिमेत तब्बल एक लाख ४८ हजार ८६९ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजारांच्या आसपास कामगारांचा म्हाडाने पहिल्या टप्प्यासाठी विचार केला. सोडतीनंतर काही महिन्यांनी म्हाडाने घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र विजयी ठरलेल्या ६२५ गिरणी कामगारांनी म्हाडाकडे संपर्कच साधला नाही. त्यानंतर म्हाडाने वृत्तपत्रांतून जाहिरातीद्वारे या गिरणी कामगारांना संपर्काचे आवाहन केले. स्पीड पोस्टाने पत्र पाठवूनही त्यांना आठवण करून देण्यात आली. त्यापैकी ११५ सूचनापत्रे परत म्हाडाकडे आली. कोणताही ठावठिकाणा नसलेल्या गिरणी कामगारांची संख्या २६० वर आली आहे. जवळपास सहा हजार घरांचे वाटप झाले आहे. दोन वर्षांत अनेकदा आवाहन करूनही त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आता म्हाडा ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नियमाप्रमाणे म्हाडाने विजेत्यांबरोबरच प्रतीक्षा यादीही जाहीर केली होती. त्यांचाही या घरांसाठी विचार होऊ शकतो, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.