टेक्नोटेक्स २०१५ चे केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते उदघाटन

techno
मुंबई – टेक्नोटेक्स 2015 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे आज मुंबईत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मुंबईतल्या गोरेगाव इथं बॉम्बे एक्झिबीशन सेंटर या ठिकाणी पुढच्या वर्षी 9 ते 11 एप्रिल दरम्यान टेक्नोटेक्स 2015 चे आयोजन करण्यात आले आहे. तांत्रिक सादरीकरण आणि कार्यान्वयनासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा तांत्रिक वस्त्रोद्योगात समावेश होतो. टायर कार्ड एअरबॅग्स, औद्योगिक पोशाख, तंबू, अग्निशमन सेवा उपकरणे, बुलेट प्रूफ जॅकेट, पॅराशूट इत्यादींचा यात समावेश आहे.

आगामी दोन वर्षात 20 टक्के वृध्दी साध्य करण्याची क्षमता तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात असल्याचे मत गंगवार यांनी यावेळी व्यक्त केले. कृषी क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय अर्थव्यवस्था तसंच वाढते उत्पादन आणि निर्यात यामध्ये तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राचे असलेले महत्त्व सरकारने जाणले आहे असे त्यांनी नमूद केले.

या क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासासाठी सरकारने चार योजना सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. तांत्रिक वस्त्रोद्योग उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने आठ संबंधित केंद्रांची निर्मिती केल्याचं वस्त्रोद्योग आयुक्त किरण सोनी यांनी यावेळी सांगितलं. वस्त्रोद्योग पार्क उभारण्याला सरकारने मान्यता दिली असून त्यासाठी 40 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्यही मंजूर केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

12 व्या पंचवार्षिक योजनेतल्या अंदाजानुसार तांत्रिक वस्त्रोद्योगाचं व्यापार क्षेत्र 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून 2016-17 पर्यंत ते 158540 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. सध्या हे क्षेत्र 109659 कोटी रुपये इतकं आहे. टीयूएफएस अर्थात तंत्रज्ञान अद्ययावत निधी योजनेअंतर्गत 850 विभागांची नोंदणी मुंबई वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयात झाली आहे. यापैकी बहुतेक विभाग हे गुजरात आणि महाराष्ट्रातले आहेत.
फिक्की आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने चौथ्या टेक्नोटेक्सचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापाराच्या नवीन संधी आणि कल्पक पर्याय शोधण्याच्या उद्देशाने उद्योग क्षेत्रातील मंडळी निर्यातदार आणि धोरणकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. “भारतीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग : आव्हाने आणि संधी” ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. परदेशी आणि भारतीय कंपन्यांमध्ये परस्पर व्यापार बैठका तसेच व्यापारातल्या नवीन संयुक्त संधी निर्माण करणे यासाठी टेक्नोटेक्स 2015 हे एक उत्तम व्यासपीठ आहे.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र भूषवणार आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि ईशान्यकडील राज्य या कार्यक्रमात भागीदार म्हणून सहभागी होणार आहेत.

Leave a Comment