सेहवागला पटविण्यात राजकीय पक्षात रस्सीखेच

virendra
दिल्ली – भारतीय क्रिकेट संघात धुवाँधार धावा रचणारा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्याकडे आता सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले असून त्याने आपल्या पक्षातर्फे दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी त्याला पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाच्या संभावित ३० खेळाडूंच्या यादीत सेहवागला वगळले गेले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमीं नाराज झाले असले तरी राजकीय पक्ष मात्र खूष झाले आहेत. कारण सेहवागचे आंतरराष्ट्रीय करियर त्याला वगळल्यामुळे संपल्यात जमा असल्याचे मानले जात आहे.

भाजपचे नेते संजय कौल यांनी सेहवागने दिल्लीतील विधानसभा निवडणूक त्यांच्या पक्षातर्फे लढवावी यासाठी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले सेहवागने आम्हाला हो म्हटलेले नाही तसेच नकारही दिलेला नाही. त्याची बहीण काँग्रेसकडून निवडणूक लढली होती मात्र एकाच कुटुंबात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सदस्य असू शकतात त्यामुळे सेहवाग भाजपतर्फे लढला तरी त्यात नवल नाही.

काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे सेहवागचा परिवार गेली पाच दशके काँग्रेस बरोबर आहे. भाजपपूर्वीच आम्ही सेहवागने आमच्या पक्षातर्फे निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याची कदाचित भारतीय संघात निवड होऊ शकते म्हणून आम्ही त्याच्याशी या विषयावर बोललो नव्हतो पण आता आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आप पार्टीने सेहवाग स्वच्छ चारित्र्याचा असल्याने आमच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास अतिशय योग्य उमेदवार आहे असे सांगितले आहे.

दुसरीकडे सेहवागकडून काहीच प्रतिक्रीया दिली गेलेली नसली तरी त्याच्या जवळच्या मित्राने मात्र सेहवागला राजकारण हा पर्याय चांगला वाटत असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment