तारकर्लीत सुरू होतेय स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र

scuba
सिधुदुर्ग – महाराष्ट्रातील व कोकणातील पहिले स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्हयातील तारकर्ली येथे सुरू होत असून त्याचे उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे समजते. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टपासून दोन किमी वर हे केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. येथे निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना एमटीडीसीचे उपव्यवस्थापक सतीश सोनी म्हणाले की या प्रशिक्षण केंद्रासाठी ऑस्ट्रेलियाच्या पीएडीए संस्थेसोबत आम्ही करार केला आहे. डायव्हिंग साठीची उपकरणे आणि अन्य तंत्रज्ञान ही संस्था पुरविणार आहे.केद्रसाठी तीन मजली इमारतीच्या गच्चीवर २१ फूट खोलीचा जलतरण तलाव बांधला गेला आहे. प्रशिक्षणार्थींना प्रथम या तलावात व नंतर समुद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्रात नोंदणीची सुरवात झाली असून त्यात जर्मन सरकार आणि केंद्रीय वनविभागाकडून फारच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. केंद्र सुरू होण्यापूर्वीच येथील बुकींग फुल झाले असून सर्वसामान्यांना बुकींगसाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी ४ ते १५ दिवसांचा आहे. त्यात ओपन स्कूबा, लाइफ गार्ड, अॅडव्हेंचर डायविग, डिस्कव्हर डायव्हिंग, रेस्क्यू डायविग असे आठ प्रकारचे कोर्स आहेत. या केंद्रामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच प्रशिक्षणार्थींना रोजगारही उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रशिक्षणाठी एमटीडीसीने ऑनलाईन बुकींगची सुविधाही दिली आहे.

Leave a Comment