काठमांडू – रविवारी रात्री उशिरा पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात सुमारे १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर ४९ जण जायबंदी झाले आहेत.
नेपाळ; बस दुर्घटना १८ ठार
कलिकोट जिल्ह्यातून कैलाली जिल्ह्यातील तिकापूर गावाच्या दिशेने प्रवाशांनी खच्चून भरलेली बस निघाली होती. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पलटली. सुमारे ६७ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते.
यामध्ये जागीच १४ प्रवासी ठार झाले तर चार जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ४९ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रस्त्यांची दुर्दशा, जुन्या वाहनांचा वापर, चालकांची बेपर्वाई यामुळे नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.