राजन यांच्या नावाचा बनावट लॉटरीसाठी वापर

rbi
नवी दिल्ली – बनावट ऑनलाइन बॅंक लॉटरीसाठी चक्क रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा धंदा जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. केवळ १५ हजार ५०० भरून लॉटरीचे साडेपाच कोटी रुपये घेऊन जा, असे आमिष ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी दाखवत आहे. हा सर्व शुद्ध फसवणुकीचा प्रकार असून ब्रिटिश सरकारने कोणताही निधी आपल्याकडे जमा केलेला नाही. या आमिषांना जनतेने भुलून जाऊ नये. अशा प्रकारची कोणतीही बॅंक लॉटरी अस्तित्वात नाही, असे रिझर्व्ह बॅंकेने कळवले आहे.

या लॉटरीची रक्कम संबंधिताच्या खात्यात जमा होण्यासाठी १५ हजार ५०० रुपयांचे मान्यता शुल्क द्यावे लागेल. ब्रिटिश सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे जमा केलेल्या काही निधीतून ही लॉटरीची रक्कम अदा करण्यात येईल, असे या टोळीमार्फत बनावट ईमेलद्वारे कळवण्यात येत आहे. या लॉटरीसाठी आपले नाव संयुक्त राष्ट्रांचे सचिव बान मून की यांच्याकडे पाठवले असल्याचा दावाही या बनावट ईमेलमध्ये करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती गोपनीय ठेवा. ती कुणालाही सांगू नका, असेही या ईमेलद्वारे कळवण्यात येत आहे. या ईमेलसोबत रिझर्व्ह बॅंकेच्या मुख्य महाव्यवस्थापकांचे बनावट ओळखपत्रही जोडण्यात येत आहे.

अशा प्रकारचे ईमेल हे केवळ बनावट असून लोकांना फसवण्यासाठी ते रिझर्व्ह बॅंकेच्या नावाचा वापर करत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने कळवले आहे. या शिवाय फसवणुकीचा आणखी एक प्रकार नुकताच उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने जनजागृतीसाठी निवेदन जारी केले होते. या प्रकारात सेंट्रल बॅंकेचे क्रेडिट कार्ड पाठवून विशिष्ट रकमेपर्यंत पैसे काढता येतील, असे आमिषही दाखवले जात आहे. हे क्रेडिट कार्ड लोकांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन केल्यावर क्रेडिट कार्डाच्या खात्यावर मोठी रक्कम जमा करण्यास सांगितले जात होते. एकदा रक्कम जमा केल्यानंतर हे कार्ड निरुपयोगी करत फसवणूक करण्यात येत आहे.

याबाबत रिझर्व्ह बॅंकेने सावधनतेचा इशारा दिला आहे. रिझर्व्ह बॅंक वैयक्तिक स्वरूपाचे कोणतेही व्यवहार करत नसून विदेशातील निधी जमा करत नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारांना भुलून न जाता ज्याला असा ईमेल येईल, त्याने तत्काळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, अशी सूचनाही रिझर्व्ह बॅंकेने केली आहे.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आयकर, कस्टम्स या सार्वजनिक संस्थांच्या नावांचा वापर करूनही लोकांची फसवणूक करण्यात येत आहे, असा सावधानतेचा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे.

Leave a Comment