बाऊंसरने कसोटीची सुरुवात करा- पॉटिंग

ricky
मेलबर्न – बाऊंसर चेंडू डोक्याला लागून फिल हयुजचा मृत्यू झाल्याने क्रिकेट जगतात बाऊंसर चेंडूवर बंदी घालण्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या ऍडलेड कसोटीची सुरुवात बाऊंसर चेंडूने झालेली पहायला मला आवडेल. पहिला चेंडू बाऊंसर पडला तर यामुळे खेळावर दाटलेले मळभ दूर होईल. खेळ सुरुच रहाणार हा संदेश जाईल आणि क्रिकेटप्रेमींची बाऊंसर चेंडूबद्दल जी भावना तयार झाली आहे त्यातून सावरतील असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज मर्व्ह हयुजेस यांनी ऍडलेड कसोटीमध्ये बाऊंसर चेंडू टाकण्याची मागणी केली होती पॉटिंगने आपल्या स्तंभातून त्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. फिलच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ज्या परिस्थितीतून जात आहेत तशा परिस्थितीतून याआधी ते गेलेले नाहीत. त्या सर्वांसाठी ही मोठी मानसिक लढाई आहे. पण माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते परिस्थितीशी जुळवून घेतील असे पॉटिंगने आपल्या स्तंभात म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या मंगळवारपासून नऊ डिसेंबरपासून पहिली कसोटी सुरु होत आहे. मीडियाशी बोलणार नाही… ह्युजच्या निधनानंतर क्लार्कवर आलेले मानसिक दडपण पाहून त्याला सोमवारी होणार्‍या कसोटीपूर्वीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याची मुभा देण्यात आली आहे. कसोटी मालिकेपूर्वी नियमाप्रमाणे चषकाचे उद्घाटन आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी उभय संघांचे कर्णधार उपस्थित असतात. मात्र क्लार्कच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन उपस्थित राहणार आहे.

Leave a Comment