सेनेच्या वाट्याला कमी दर्जाची खाती

vidhansabha
मुंबई – शिवसेनेला सत्तेत सहभागी करून शुक्रवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्यानंतर समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आलेले विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि राजकुमार बडोले यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या अहेरी मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभा सदस्य झाल्यानंतर राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आलेले राजे अम्बरिश महाराज यांच्याकडे आदिवासी विकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबत अकोला येथील विधान परिषद सदस्य डॉ. रणजित पाटील यांच्याकडे गृह (शहरे), नगर विकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय आणि संसदीय कार्य विभाग तर, अमरावतीचे प्रवीण पोटे यांच्यावर उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे महसूल विभाग देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर नऊ मंत्र्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या खातेवाटपात फारसा बदल करण्यात आलेला नसला तरी, एकदोन तुरळक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रकाश मेहता यांच्याकडे असलेला उद्योग विभाग काढून तो शिवसेनेच्या सुभाष देसाई यांना देण्यात आला आहे, तर मेहता यांच्याकडेच असलेल्या संसदीय कार्य विभागाची जबाबदारी गिरीश बापट यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आता मेहता यांच्याकडे गृहनिर्माण आणि कामगार ही खाती देण्यात आली आहेत. विष्णू सावरा यांच्याकडे असलेली सामाजिक न्याय आणि विशेष साह्य ही दोन खाती काढून, ती राजकुमार बडोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही अनेक खात्यांचा पदभार आहे. परंतु, नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर काही छोट्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे आणखी एका विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांकडे असलेला भार कमी होईल.

मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांचे खातेवाटप असे-

* कॅबिनेट मंत्री
गिरीश बापट : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कार्य
गिरीश महाजन : जलसंपदा
दिवाकर रावते : परिवहन
सुभाष देसाई : उद्योग
रामदास कदम : पर्यावरण
एकनाथ शिंदे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा
बबनराव लोणीकर : पाणी पुरवठा व स्वच्छता
डॉ. दीपक सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
राजकुमार बडोले : सामाजिक न्याय व विशेष साह्य

* राज्यमंत्री
प्रवीण पोटे : उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून)
डॉ. रणजित पाटील : गृह (शहरे), नगर विकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय आणि संसदीय कार्य
राम शिंदे : गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन
विजय देशमुख : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग
दादा भुसे : सहकार
विजय शिवतारे : जलसंपदा, जलसंधारण
दीपक केसरकर : वित्त, ग्रामविकास
रवींद्र वायकर : गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण
राजे अम्बरिश महाराज : आदिवासी विकास
संजय राठोड : महसूल

Leave a Comment