मोदी ठरले ‘एशियन ऑफ द इयर’

narendra-modi
सिंगापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूर येथील माध्यमांच्या समुहाने भारतात विकास कार्यक्रम धडाक्याने राबवित आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत संपूर्ण जगालाच आकर्षित केल्याबद्दल ‘एशियन ऑफ द इयर’ म्हणून निवड केली.

पंतप्रधान हे पद नरेंद्र मोदी यांच्याकरिता नवीन असतानाही त्यांनी आशियावर आपली आगळीच छाप उमटवली आहे. भारताच्या सर्वच शेजारी देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याच्या दिशेने त्यांनी ठोस पावले उचलली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा बळकट होईल, असा विश्‍वास जागवून त्यांनी संपूर्ण जगालाच प्रोत्साहित केले असे ‘स्ट्रेट्‌स टाईम्स’ या आघाडीच्या वृत्तपत्राचे प्रकाशक असलेल्या सिंगापूर प्रेस होल्डिंग लिमिटेडने म्हटले आहे.

मोदी यांनी आपल्या सर्व लोकांना, प्रशासकीय अधिकार्‍यांना नवी दिशा आणि उद्देश दिला आहे. गेल्या मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपाला जे स्पष्ट बहुमत मिळाले, त्याचा योग्य वापर करून मोदी यांनी भारत आशियातील प्रमुख शक्ती आहे, हे दाखवून दिले. आम्ही मोदी आणि भारताला आगामी यशाच्या मनापासून शुभेच्छा देतो, असे या वृत्तपत्राचे संपादक वॉरेन फर्नांडिस यांनी म्हटले आहे.

Leave a Comment