नग्गर – हिमालयाच्या कुशीतले चिमुकले गांव

naggar
हिमाचल प्रदेशाला देवभूमी म्हणून ओळखले जाते. याच हिमाचल राज्यात बियास काठी वसलेले छोटेसे पण अतिसुंदर गांव म्हणजे नग्गर गांव. पूर्वीच्या कुलु राजाची ही राजधानी. आजही पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असलेले शांत, सुंदर गांव अशीच त्याची ओळख आहे. अर्थात हे गांव अगदी छोटे असले तरी भारतातील कोणत्याही हिल स्टेशनवर मिळतात तशा सर्व सुविधा येथे मिळतातच पण येथील बाजार तुम्हाला थेट युरोपची आठवण करून देणारा आहे.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या गावाला चौफेर उत्तुंग बर्फाच्छादित रांगांनी वेढलेले आहे. देवदाराची दाट जंगले, तर्हतर्हेच्या फुलवेली आणि सफरचंदांच्या बागा यांनी समृद्ध असलेल्या या गावाला इतिहासात आणखीही एक महत्त्व आहे. ते म्हणजे प्रसिद्ध रशियन चित्रकार निकोलस रोहरीख यांचा येथे अगदी जुना बंगला आहे. या बंगल्यात आजही त्यांच्या चित्रकृती पाहण्यास मिळतात. हा असा पहिला चित्रकार होता ज्याने हिमालयातील अनेक दुर्गम ठिकाणी भ‘मंती केली आणि तेथील सौदर्य आपल्या कुंचल्याने कॅनव्हासवर उतरविले. 1930 साली त्याने येथे घर बांधले. तेथे त्याची जुनी ड्राईज कार, घरातले सामान आणि चित्रे जतन करून ठेवली गेली आहेत.

नग्गरच्या बाजारात लाकडात बांधलेला एक सुंदर महालही आहे. हा महाल म्हणजे येथील स्थानिक राजाचे निवासस्थान. आता तेथे हिमाचल पर्यटन निगमचे हॉटेल आहे. येथे एक संग्रहालयही आहे. त्यात त्याकाळची शस्त्रे, अस्त्रे आणि जीवनशैली दाखविणा-या अनेक वस्तूंचा संग्रह आहे. या बाजारात तुम्ही शिरलात की जणू स्वित्झर्लंडच्या एखाद्या गावात गेल्याचा फील येतो. येथे अनेक तर्हेच्या पेस्ट्रीज, आयरिश कॉफी अशा पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेता येतो तसेच खास भारतीय जेवणाची लज्जतही चाखता येते.

गांवात पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक मंदिरेही आहेत. त्यात कृष्ण मंदिर, रघुनाथ मंदिर यांचा समावेश आहे. कुल्लू आणि मनाली या दोन्ही ठिकाणांपासून नग्गर 22 किमीवर अंतरावर आहे. येथून रोहतांग पासला भेट द्यायची असेल तर 75 किमीचा प्रवास करावा लागतो. येथे येण्यासाठी कुलूला विमानतळ आहे किंवा दिल्लीहून बसने येता येते. कुल्लूपासून टॅक्सी करून नग्गरला जाता येते.

येथे बर्फाची मजा लुटायची असेल तर डिसेंबर ते फेब्रुवारी हा चांगला काळ आहे. मात्र फार थंडी नको असेल तर मार्च ते जून हा चांगला काळ आहे.

Leave a Comment