प्रभात टॉकीज विक्रीविरोधात आंदोलनाचा इशारा

prabhat
पुणे – मराठी चित्रपटांचे हक्काचे घर म्हणून ओळखल्या जात असलेल्या पुण्यातील प्रभात या जुन्या चित्रपटगृहाची जागा मालकाने बिल्डरना विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. मात्र गेली ८० वर्षे पुण्याची खास ओळख असलेल्या या विशेष चित्रपटगृहाची विक्री थांबावी आणि चित्रपटगृह जतन केले जावे यासाठी मराठी चित्रपट उद्योगाने आंदोलन छेडण्याचा विचार चालविला असल्याचे कळते.

या जुन्या चित्रपटगृहाने कायम मराठी चित्रपटच दाखविले आहेत. पुण्याच्या भरवस्तीत असलेल्या या जागेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे. त्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची तयारीही त्यांनी मालकांना दाखविली आहे. चित्रपटगृहाचे मालक सरदार किबे इंदोर येथे वास्तव्यास असून या चित्रपटगृहाचे संचालन विवेक दामले यांच्याकडे आहे. दामले या संदर्भात म्हणाले की मराठी चित्रपटातून थिएटर मालकाला कमी नफा होतो त्यामुळे मालकांना जागा विकायची आहे. मात्र आमच्याकडे या चित्रपटगृहाची मालकी आली तर आम्ही थिएटरचे नूतनीकरण करून थिएटर मराठी चित्रपटांसाठी कायम ठेवू. मुख्य म्हणजे येथून जवळच शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू असल्याने या जागी मोठी इमारत बांधण्यास परवानगी मिळू शकत नाही. त्यापेक्षा चित्रपटगृहाचेच जतन करणे अधिक योग्य आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले की प्रभात गेली कित्येक वर्षे केवळ मराठी सिनेमे दाखवित आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी चित्रपटांचे हे हक्काचे घर राहिले नाही तर मराठी चित्रपटसृष्टीचेही मोठे नुकसान होईल.

Leave a Comment