पुढील वर्षापासून फ्रान्समध्ये डिझेल गाड्यांवर बंदी

trance
पॅरिस – पुढील वर्षापासून पर्यावरण संरक्षणाचा उपाय म्हणून फ्रान्समध्ये डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. पंतप्रधान मॅन्युअल व्हाल्स यांनी ही घोषणा नुकतीच केली आहे. जगात सर्वाधिक डिझेल कार अथवा गाड्यांचा सर्वाधिक वापर ज्या थोड्या देशात होतो त्यात फ्रान्सचा समावेश असून येथे एकूण गाड्यांपैकी ८० टक्के गाड्या डिझेलवर चालतात.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्स सरकार वाहनांसाठी पुढच्या वर्षात आयडेंटिफिकेशन सिस्टीम लाँच करत आहे. या सिस्टीममुळे वाहन किती प्रदूषण करते आहे त्याची चाचणी घेतली जाणार असून तसे रेटिंग संबंधित वाहनाला दिले जाणार आहे. जी वाहने अधिक प्रदूषण करतात त्यांना शहरात बदी घातली जाणार आहे. फ्रान्समधील कार ग्राहकांनी दीर्घकाळ डिझेल वाहनांना पसंती दिली आहे याचे मुख्य कारण म्हणजे येथे पेट्रोल आणि डिझेलवरील करात असलेला फरक. सध्या पेट्रोलच्या तुलनेत डिझेल १५ टक्के स्वस्त आहे.

पंतप्रधान व्हाल्स यांनी असे स्पष्ट केले आहे की पुढील वर्षापासून डिझेल आणि पेट्रोल करातील तफावतही कमी केली जाणार असून नवीन करप्रणाली लागू केली जाणार आहे. त्यामुळेही डिझेल वाहने वापरणे फारसे स्वस्त राहणार नाही. पर्यावरण प्रदूषणात डिझेल गाड्या मोठी भर घालत आहेत व त्यामुळे त्यांच्यावरील बंदीचा निर्णय घेतला गेला आहे. विशेष म्हणजे फ्रान्सचे उर्जामंत्री सेगोलान रॉयल यांनीही जे वाहनचालक डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्यास पसंती देतील त्यांना १० हजार युरो बोनस दिला जाईल असेही नुकतेच जाहीर केले आहे.

Leave a Comment