फडणवीसांवर रिमोट कंट्रोल नाही- अण्णा हजारे

anna
नागपूर – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही रिमोट कंट्रोल नाही त्यामुळे हे नेतृत्त्व महाराष्ट्राचे हेडमास्तर बनू शकते असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूरातील धनवटे नॅशनल कॉलेजच्या कार्यक्रमासाठी ते येथे आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधात देशभरात जनआंदोलन उभे करण्यात कमालीचे यश मिळविलेले अण्णा पंतप्रधान मोदींबाबत बोलताना म्हणाले की मोदींनी निवडणुकीत मते मिळविण्यासाठी काळा पैसा मुद्दा वापरला. काळा पैसा परत आणणे ही मोठी प्रक्रिया आहे याची माहिती मोदींना होती तरी त्यांनी हा मुद्दा प्रचारात घेतला. मात्र काळा पैसा परत आणण्याबाबत अजून कोणतीच ठोस पावले उचललेली नाहीत. मोदींनीच प्रचारात सांगितले होते की परदेशातील काळा पैसा परत आणला तर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँकेत १५ लाख रूपये असतील. मात्र सहा महिने उलटूनही त्यांनी कांहीही केलेले नाही.

मोदींना या संदर्भात पत्र पाठविले होते असे सांगून अण्णा म्हणाले पत्राची पोच आली आहे. कांही काळ आम्ही वाट पाहू नाहीतर पुन्हा आंदोलन उभे करू. मोदींवर युवा पिढी फिदा आहे त्यामुळे कदाचित माझ्या शब्दांना वजन राहिले नसेलही. मात्र तरीही आम्ही वेळ पडल्यास पुन्हा जनआंदोलन उभे करू. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना त्यांनी कोणतेच सरकार शेतकर्‍यांविषयी गंभीर नसल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांचे प्रश्न सुटण्यासाठी राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल आणि ग्रामसभा अधिकार असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment