दहशतवादी करताहेत आत्मघाती हल्लेखोर म्हणून पक्ष्यांचा वापर

birds
काबूल – दहशतवादी आत्मघाती हल्लेखोर म्हणून मोठ्या पक्ष्याचा वापर करत असल्याचे पुरावे मिळत असून अफगाणिस्तानातील फरयाब प्रांतात असा पक्षी पोलिसांनी मारला असल्याचे समजते. या मारलेल्या पक्ष्याच्या अंगावर पोलिसांना स्फोटके, जीपीएस व डिटोनेटर सापडले आहेत. अमेरिकन नाटो सैनिक अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत असतानाच हा प्रकार आढळला आहे.

अफगाणिस्तानचे पोलिस मेजर जनरल अबुल नबी इलहाम यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार सोमवारी फरयाब प्रांतात एक मोठा पक्षी तारेवर लटकला असल्याचे पोलिसांना दिसून आले. हा पक्षी पोलिसांना ठार केला तेव्हा त्याच्या अंगावर विशेष जॅकेट होते व त्यात जीपीएस, छोटा कॅमेरा, स्फोटके आणि मोबाईल फोन सापडला. हे पक्षी तुर्कमेनिस्तानच्या भागात आढळतात असेही इलहाम यांनी सांगितले.

नाटो सैन्य अफगाणिस्तान सोडणार आहे. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे साडेतीन लाख अफगाणी सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यावर ६१ लाख डॉलर्स खर्चही केला गेला आहे. मात्र अफगाण पोलिसांकडे दहशतवादी हल्ले झाल्यास त्यांचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी शस्त्रे नाहीत. प्रत्येक चेक पॉईंटवर केवळ ३ हातबॉम्ब दिले जातात मात्र एकाचवेळी २०० दहशतवादी चेक पॉईंटवर हल्ला करतात तेव्हा पोलिसांना तेथून माघार घेण्याशिवाय अन्य पर्याय नसतो असेही पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment