बिजिग- रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांनी सोडलेल्या दुर्मिळ सायबेरियन वाघाने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून एका शेतकर्याच्या १५ बकर्यांचा फन्ना उडविला असल्याचे वृत्त चीनच्या शिन्हुआ या सरकारी न्यूज एजन्सीने दिले आहे.
पुतीन यांनी सोडलेल्या वाघाचा चीनमध्ये धुमाकूळ
या बातमीनुसार उस्तीन या नावाच्या वाघाने हेलोंगपियांग प्रांतातील फुयुआन कौंटीत १५ बकर्यां ठार केल्या आहेत. बकर्यांचा मालक गुओ युलिन याने सांगितले की, सोमवारी सकाळी त्याच्या सर्व बकर्या मेलेल्या आढळल्या तर तीन बकर्या गायब होत्या. मेलेल्या बकर्याच्या मानेवर वाघाच्या दाताच्या निशाण्या होत्या तसेच मातीत वाघाची पावले उठली होती.
रशियातील तज्ञांनी दोन वर्षांपूर्वी सायबेरियन वाघांची ५ पिल्ले जगविली होती आणि त्यांना शिकार करायला शिकविले होते. या वर्षी राष्ट्रपती पुतीन यांनी ३ वाघ सायबेरियात सोडले त्यात वरील वाघ उस्तीन याचाही समावेश होता. या तीनातील दोन वाघ चीनच्या सीमेत घुसले आहेत. वाघांच्या शरीरावर बसविलेल्या ट्रॅकींग डिव्हाईसमुळे ही बाब उघडकीस आली असून त्यांच्यावर चायनीज वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन वर्कर्स सतत नजर ठेवून आहेत. चीनच्या हद्दीत घुसलेल्या दुसर्या वाघाने म्हणजे कुजया याने याच भागात ५ कोंबड्यांची शिकार केल्याचेही सांगितले जात आहे.