महाराष्ट्रात सुरू होणार सीएमओ

fadana
मुंबई – केंद्रात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोशल साईटचा वापर वाढवून पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) कामकाज वेगळ्या पद्धतीने सुरू केल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याच धर्तीवर राज्यात सीएमओ ( चीफ मिनिस्टर ऑफिस) सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. पारदर्शक कारभारावर मुख्यमंत्र्यांचा विशेष भर असून त्यासाठीच हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रालयात नागरिकांकडून विविध कामांसाठी लाखो पत्रे येत असतात. मंत्रालयाच्या कोणत्याही विभागाला आपण पत्र पाठविले असेल तर ते कुठपर्यंत पोहोचले याचा शोध नव्या सीएमओ मुळे अर्जदार स्वतःच ऑनलाईन घेऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व मंत्र्यांनीही सोशल साईटवर आपल्या खात्याचा कारभार कसा चालला आहे याची माहिती द्यावयाची आहे. याचा उपयोग जलद पारदर्शी कारभार करण्यासाठी तसेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी होणार आहे.

या कामी मुख्यमंत्र्यांसाठी निधी कामदार, कौस्तुक धवसे आणि प्रिया खान या तीन तज्ञ युवा टीमची नेमणूक केली असून ते आयटी, पॉलसी बजेट आणि प्लॅनिग मधील तज्ञ आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले नवीन निर्णय त्वरीत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सोशल साईटच्या माध्यमातून केले जाणार आहे. मंत्रालयाकडे होत असलेला मुख्य पत्रव्यवहार पाहाता यावा यासाठी फेसबुक अकौंट उघडले जात आहे तसेच मेक इन महाराष्ट्र योजनेसाठी ट्वीटर अकौंटचा वापर केला जाणार आहे.

या कामी पूर्वीच्या पीआर विभागातील कर्मचार्‍यांनाच प्रशिक्षित करण्यात येणार असून ही माहिती मराठीप्रमाणेच इंग्रजी आणि हिंदीतूनही दिली जाणार आहे. महान्यूजचे नवे पोर्टलही बनविले जात असल्याचे निधी कामदार यांनी सांगितले.

Leave a Comment