नेपाळ पशुबळी उत्सवात ५ हजार रेड्यांचा बळी

bali
काठमांडू- दक्षिण नेपाळमधील बारा जिल्ह्यातील बरीयापूर गढीमाई मंदिरात यंदा पशुबळीचा परंपरागत उत्सव नुकताच साजरा झाला असून त्यात ५ हजार रेड्यांचा बळी दिला गेल्याचे समजते. दर पाच वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवात रेड्याचा बळी देणार्‍यांचे भविष्यात नशीब फळफळते आणि घरात सुखसमृद्धी येते असा भाविकांचा विश्वास आहे. ही अघोरी प्रथा बंद करण्यासाठी पशुअधिकार कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

दर पाच वर्षांनी येणार्‍या या उत्सवासाठी प्रचंड संख्येने श्रद्धाळू येतात.गढीमाई ही हिंदू देवी प्रसन्न व्हावी यासाठी येथे पशुबळी दिले जातात. यंदा ४४ कसायांनी पहिल्याच दिवशी ५००० रेड्यांचा बळी दिला. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या उत्सवात आणखी हजारो बकर्‍या, डुकरे, कोंबड्या याचेही बळी दिले जाणार आहेत. शतकानुशकते ही परंपरा चालत आली आहे. पशु अधिकार कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांना थोडेफार यश आल्याचा त्यांचा दावा आहे. कारण गतवेळच्या उत्सवात १० हजार रेडे बळी दिले गेले होते ती संख्या यंदा निम्यावर आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या उत्सवात भारतातील उच्च न्यायालयाने या काळात नेपाळमध्ये रेडे निर्यात करण्यास बंदी घालण्याचे आदेश सरकारला दिले होते. मात्र मंदिर उत्सव आयोजक समितीने पत्रकार आणि फोटोग्राफर यांना बळी देतानाचे फोटो काढण्यास मज्जाव केला होता.

Leave a Comment