…अन्यथा तपास ‘सीबीआय’ करेल – फडणवीस

devendra
नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) जवखेडा हत्याकांड ही गंभीर घटना असून आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे आणि जर दिलेल्या वेळेत तपास पोलिसांनी पूर्ण न केल्यास तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा पोलिस दलाला दिला. जनतेला दाखविण्यासाठी चुकीची कारवाई होऊ देणार नाही, असे सांगत ख-या आरोपींना शोधून काढून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित जाधव कुटुंबियांना या वेळी दिले.

या हत्याकांडाला दिड महिना उलटल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवखेडे-खालसा गावात जाऊन पीडित जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. नगर जिल्हयातील जवखेडे-खालसा गावात काही दिवसांपूर्वी दलित जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. मारेकऱयांच्या अटकेच्या मागणीसाठी दलित संघटनांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे गावात जाऊन पीडित जाधव कुटुंबियांची भेट घेतली होती. राज्य सरकरच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी जवखेडे-खालसा गावात जाऊन पीडित जाधव कुटुंबियांची भेट घेतली.

Leave a Comment