सोने आयातीवरील निर्बंध हटले

jewel
मुंबई – रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रात्री उशीरा सोने आयातीवर लागू असलेली ८०:२० योजना त्वरीत प्रभावाने रद्द केल्याने सराफी उद्योग व्यवसायात समाधान व्यक्त केले जात आहे. ही योजना रद्द करून मोदी सरकारने सराफी उद्योगाला मोठाच दिलासा दिल्याची भावना नामवंत सराफांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वी सोने आयातीमुळे सरकारच्या चालू खात्यावर प्रचंड बोजा येत होता. परिणामी आयात केलेल्या सोन्याच्या २० टक्के सोने दागिने स्वरूपात निर्यात करण्याचे बंधन घातले गेले होते. मात्र कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेला रूपया यामुळे ही तूट कमी झाली आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेने सोने आयातीवरची ८०:२० योजना रद्द करण्याची घोषणा केली असून त्यापूर्वी वित्त मंत्रालयाची सहमती घेण्यात आल्याचे समजते. मात्र सोने आयातीसंदर्भातले अन्य नियम कायम ठेवण्यात आल्याचेही रिझव्हॅ बँकेने स्पष्ट केले आहे.

या योजनेत सुरवातीला रिझव्हॅ बँकेने फक्त सरकारी कंपन्यांना आयातीत सूट दिली होती. त्यानंतर यूपीए सरकारने निवडणुकांच्या तोंडावर ६ खासगी कंपन्यांनाही ही सूट दिली. सोने आयातीवरील निर्बंध असूनही आक्टोबरमध्ये सोने आयातीत २७१ टक्के वाढ नोंदविली गेली होती. उद्योगसमुहाकडूनही सोने आयातीवरील निर्बंध कमी करण्याची वारंवार मागणी केली जात होती त्याचबरोबर गेल्या कांही महिन्यात देशांत प्रचंड प्रमाणात सोने तस्करी वाढली आहे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही सोने आयातीवरील निर्बंध कांही प्रमाणात उठविणे गरजेचे होते असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment