विवाहाचा खर्च टाळून शाळेच्या स्वच्छतागृहासाठी देणगी!

sulabh
सोलापूर : साखरपुड्यातच विवाह सोहळा उरकून घेत वधू-वराकडील मंडळींनी विवाहात होणारा वायफळ खर्च टाळून खर्चाचीच रक्कम गावातील शाळेला स्वच्छतागृह बांधण्यासाठी दिली. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पापरी येथे ही सामाजिक भान जपणारी घटना घडली.

पापरी येथील सुजित सुभाष गोडसे आणि याच तालुक्यातील वाफळे गावच्या उज्ज्वला धनाजी पाटोळे यांचा विवाह ठरला होता. विवाहाअगोदर रिवाजानुसार साखरपुडा झाला. साखरपुड्यात गावातील सर्व मंडळींसह नातेवाईक उपस्थित राहिल्यानंतर एका प्रतिष्ठित गावकर्‍याने वायफळ खर्च टाळण्यासाठी साखरपुड्यातच विवाह सोहळाही उरकण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला वधू-वराकडील मंडळींनी लगेचच होकार दिला. त्याचवेळी विवाहात होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत ५१ हजार रुपयांची रक्कम गावातील सुरेश भोसले प्रशालेत स्वच्छतागृह बांधण्यासाठी देणगीच्या स्वरूपात दिली. वधूपिता धनाजी पाटोळे यांनीही वरपक्षाला प्रतिसाद देत स्वच्छतागृहासाठी १० हजार रुपयांंची देणगी दिली. दोन्ही कुटुंबांनी अलीकडे दुर्मिळ ठरलेली सामजिक जाणीव दाखवल्याने परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

Leave a Comment