इंग्लंडच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा घटस्फोट

divorce
लंडन – इंग्लंडच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा घटस्फोट ठरला आहे तो म्हणजे अब्जाधीश उद्योजक ख्रिस हॉन आणि त्याची पत्नी जेमी कूपर-हॉन यांचा. स्थानिक न्यायालयाने हॉन यांनी आपल्या पत्नीला ५३ कोटी रुपयांची पोटगी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.

मात्र, येत्या १२ डिसेंबरला या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार असून, तोपर्यंत या निर्णयात बदल होण्याची शक्यता न्यायालयीन कामकाजाशी संबंधित सूत्राने व्यक्त केली आहे. या दाम्पत्याची एकूण मालमत्ता १.३ अब्ज डॉलर्स इतकी असून त्यापैकी अर्ध्या संपत्तीवर जेमी कूपरने अधिकार सांगितला होता. मात्र, या संपत्तीचा बराचसा भाग आपल्या १७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात कुटुंबाच्या कल्याणासाठी खर्च केला असल्याचे ४९ वर्षीय हॉन यांनी न्यायालयाला सांगितले. ख्रिस हॉन यांनी आपल्या पत्नीवर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला असून, तिने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. या दाम्पत्याला एकूण चार अपत्ये असून, त्यात एका तिळ्याचा समावेश आहे.

जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेचे म्हणजेच ‘इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन’चे संस्थापक असलेल्या हॉन दाम्पत्याच्या घटस्फोटामुळे संस्थेच्या कामावर परिणाम होणार आहे. बालमृत्यू, कुपोषण, शिक्षण आणि हवामान बदल या क्षेत्रात कार्यरत या संस्थेची वार्षिक उलाढाल ४ अब्ज डॉलर्सची आहे. विकसनशील देशांमध्ये गरजू आणि गरीब मुलांसाठी या संस्थेने लाखो डॉलर्स दिले आहेत.

Leave a Comment