आठ डिसेंबरपर्यंत आरिफ पोलिस कोठडीत

aarif
मुंबई – आरिफ माजिदला शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरिफला आठ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला इसिस या दहशतवादी संघटनेच्या भारतातील कार्यपध्दतीविषयी महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे.

आरिफ माजिद, फरहान शेख, साहिम तंकी आणि अमान तांडेल हे कल्याण परिसरात रहाणारे चार तरुण अचानक काही महिन्यांपूर्वी गायब झाले होते. त्यानंतर ते इसिस या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी इराकला गेल्याची माहिती समोर आली.

शुक्रवारी पहाटे आरिफला तुर्कीहून मुंबईला एनआयचे विशेष पथक घेऊन आले. या मोहिमेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. इराकमधील हवाई हल्ल्यात आरिफचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी आरिफने वडिलांना फोन करुन आपण तुर्कीत असल्याचे सांगितले. इसिससोबत तीन महिने काम केल्यानंतर आपण तुर्की येथे पळून आल्याचे त्याने वडिलांना सांगितले.

इसिसच्या कार्यपध्दतीची महत्वपूर्ण माहिती आरिफच्या अटकेमुळे उघड होणार असून इसिस कशाप्रकारे मुस्लिम तरुणांना आपल्या जाळयात ओढत आहे ते समोर येणार आहे. आरिफला मुंबईत आणल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. आरिफला भेटण्यासाठी ते मुंबईत आले होते.

Leave a Comment