गॅस्ट्रोने घेतला १३ लोकांचा बळी

gastro
सांगली: गॅस्ट्रोच्या साथीने सागंलीत आणि मिरज शहरात थैमान घातले असून आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोच्या साथीने तब्बल १३ नागरिकांचा बळी घेतला आहे. याशिवाय ५०० जणांना या रोगाची लागण झाली आहे. मात्र सांगलीतील राजकीय नेते आरोपप्रत्यारोपात मग्न आहेत.

गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर मिरजमधील ब्राह्मणपूरी, विजापूर वेस, टाकळी रस्ता, गोदड मळा, कोकणे गल्ली, सहारा कॉलनी, शास्त्री चौक, नदीवेस या भागात आढळून आले आहेत. एकीकडे पालिकेच्या आरोग्य विभागाने साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र जुनाट पाणीपुरवठा यंत्रणा आणि शहरातील घाणीचे साम्राज्य सगळ्या उपाययोजनांना पुरुन उरत आहे.

दुर्दैव म्हणजे पालिकेच्या पाईपलाईनमध्ये गळती होऊन पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळले जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांची याकडे डोळेझाक सुरु आहे.