राजनाथ सिंह यांच्या हस्ते ई-व्हिसाचा शुभारंभ

e-visa
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते केंद्र सरकारने अमेरिका, जर्मनी आणि इस्त्रालयसह ४३ देशातील नागरिकांसाठी इ-व्हिसा या सुविधेची सुरुवात करण्यात आली.राजनाथ सिंह यांनी हा निर्णय देशातील पर्यटन क्षेत्राची वाढ करण्याच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे सांगितले. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी सात टक्के उत्पन्न पर्यटन क्षेत्रातून येते. हे प्रमाण दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.

या सुविधेअंतर्गत ४३ देशातील नागरिक वेबसाइटवरून व्हिसासाठी अर्ज दाखल करु शकतील. तसेच त्याचे शुल्क देखील ते ऑनलाइन भरू शकतील. नागरिकांना अर्ज दाखल केल्यानंतर ७२ तासात त्यांना इ-व्हिसा उपलब्ध मिळेल.

रशिया, उक्रेन, ब्राझील, जॉर्डन, केनिया, फिजी, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, मॉरिशस, सिंगापूर, मॅक्सिको, नॉर्वे, फिलिपाइन्स आदी देशातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात इ-व्हिसाची सुविधा मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात केवळ ४३ देशातील नागरिकांना ही सुविधा देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात जगभरातील सर्वच देशातील नागरिकांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे.

इ-व्हिसाची मुदत केवळ ३० दिवसांची असेल आणि वर्षातून दोन वेळा पर्यटक यासाठी अर्ज करु शकेल. या शिवाय विमानतळावर दाखल झाल्या झाल्या व्हिसा मिळण्याची सुविधा काही देशांसाठी सुरु असल्याचे सिंह यांनी सांगितले.

Leave a Comment