चंपाषष्ठीला जेजुरी आणि कोल्हापूरात लोटला जनसागर

jejuri
कोल्हापूर – महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडोबारायाचे नवरात्र महाराष्ट्रात मोठ्या चैतन्याच्या वातावरणात घरोघरी तसेच मंदिरातून साजरे झाले असून काल चंपाषष्ठीच्या निमित्ताने राज्यभरातून भाविकांनी जेजुरी गडावर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात एकच गर्दी केली होती. यंदा चंपाषष्ठी गुरूवारी आणि शुक्रवार अशा दोन दिवशी आहे. मात्र चंपाषष्ठीचे धार्मिक कार्यक्रम गुरूवारीच पार पाडण्यात आले आहेत.

जेजुरी गडावर भाविकांनी बेलभंडार उधळून यळकोट यळकोट जय मल्हारच्या गर्जनांनी अवघा गड दुमदुमवून टाकला. गडाच्या पायर्‍या भाविकांनी भरून गेल्या होत्याच पण गडाखालीही मोठ्या रांगा लागल्याचे दृष्य दिसून येत होते. देवा माझी सोन्याची जेजुरी चा प्रत्यय उधळलेल्या भंडार्‍यामुळे प्रत्यक्ष येत होता.

कोल्हापूरातही भाविकांनी करवीर निवासिनी जगदंबा अंबाबाईच्या दर्शनासाठी अशीच गर्दी केली होती. कोल्हापूरातही चंपाषष्ठीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी खुद्द मल्हारीमार्तंड म्हणजे खंडोबा त्याची पत्नी म्हाळसादेवीसह आदिशक्ती अंबाबाईच्या दर्शनासाठी येतो असा भाविकांचा विश्वास आहे. या निमित्ताने मंदिरात अभूतपूर्व सजावट करण्यात आली होती.

Leave a Comment