मुंबई – ‘आम आदमी पक्षाचे’ प्रमुख अरविंद केजरीवालांचे दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षनिधी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत ‘आप’कडून डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तरुण उद्योजक, हिरे व्यापारी आणि काही बॉलीवूड दिग्दर्शकांनी सहभाग घेतला होता. केजरीवालांच्या डिनर पार्टीत जेवणाची किंमत २० हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती.
‘डिनर विथ केजरीवाल’मधून ९१ लाखांचा निधी जमा
काल रात्री मुंबईत झालेल्या या पार्टीतून आपने ९१ लाख रुपयांचा निधी जमवला असून त्यापैकी ३६ लाख रुपये चेकच्या स्वरुपात जमा झाले तर आपच्या कार्यकर्त्यांनी २१ लाख रुपयांचा निधी जमा केल्याची माहिती आपच्या नेता प्रीती शर्मा मेनन यांनी दिली. पुढील डिनर पार्टी बंगळूरुमध्ये आयोजित कऱण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन डोनेशनच्या माध्यमातूनही ‘आप’ पक्षनिधी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे पुढील दोन महिन्यात पाच कोटीहून अधिक रुपयांचा निधी गोळा करण्याचे ‘आप’चे लक्ष्य आहे. केजरीवालही लोकांना निधीस्वरुपात मदत करण्याचे आवाहन करत आहे, असे मेनन म्हणाल्या.