सत्तेत सहभागाच्या चर्चेचे गु-हाळ उद्यापासून

devendra-fadnvis
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत शिवसेनेला सत्तेत घेण्याची आमची पूर्ण तयारी झाली असून शिवसेनेला आम्ही सत्तेत घेणार असल्याची घोषणा केली. केंद्रीयमंत्री धर्मेद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेला सत्तेत किती व कसा वाटा द्यायचा यासाठी चर्चा करण्याचे सर्व अधिकार देण्यात आहेत. शिवसेनेशी हे दोघे उद्यापासून चर्चा करतील अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चेचे गु-हाळ रंगणार आहे.

फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या मंगळवारी करणार असून त्यासाठी रविवारपर्यंत शिवसेनेशी अंतिम चर्चा करून युतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली आहे. योग्य वाटा मिळत असल्यास आम्ही तुमच्या सरकारमध्ये सामील होऊ असे उद्धव यांनी या दोघांना सांगितले आहे. शिवसेनेशिवाय आपण स्थिर सरकार देऊ शकत नाही याची जाणीव फडणवीस यांना असल्यानेच त्यांनी शहा यांच्याशी चर्चा करताना सेना सोबत असणे कसे महत्त्वाचे व गरजेचे आहे याची माहिती दिली आहे.

Leave a Comment