मुंबईतील जागांच्या किमतींत २० टक्के घट होण्याचे संकेत

mumbai
मुंबई – भारताची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या अनेक वर्षांनंतर जागांच्या भावात येत्या कांही महिन्यात २० टक्के घट होईल असे आस्कतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. मुंबईत आजही बाहेरून येणार्‍यांचे प्रमाण खूप जास्त असले तरी मुंबईला विस्ताराला जागा राहिलेली नाही. या बंदर शहरात यामुळे उंच इमारती बांधल्या जात आहेत. येथील जागांची मागणी कधीच कमी होत नसली तरी गेल्या काही काळात येथे अनेक घरे बांधून तयार आहेत. परिणामी ग्राहक आणि जागा यांचे प्रमाण समसमान झाल्याने येथील घरांच्या किमती उतरू लागल्या आहेत.

आस्कचे सीईओ सुनील रोहोकले यासंदर्भात बोलताना म्हणाले की मुंबईत वर्षाला साधारणपणे सव्वा ते दीड लाख घरांना मागणी असते. मध्यंतरी येथील जागांचे दर २० ते ३० टक्के वाढले होते. मात्र आता घरांचा पुरवठा मुबलक होत असल्याने दरात करेक्शन येऊ लागले आहे. आजही वित्त, मिडीया, टेलिकॅम, मनोरंजन, आयटी, जेम्स ज्युवेलरी, ट्रडिंगग या क्षेत्रातील लोकांकडून जागांना मागणी आहे आणि ती कायम राहणार आहे. मात्र आर्थिक विकासाचा सुधारत चाललेला दर यामुळे लोकांचा इन्कम, रोजगार संधी वाढणार आहेत. त्यातच कर्जाच्या व्याजदरात घसरण होत असल्याने तसेच इमारत बांधकाम मंजुरी प्रथेतील बदलामुळे बांधकाम व्यावसायिकांनी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.

सध्या घाटकोपर, नवी मुंबई, चेंबूर, अंधेरी या भागात अधिक प्रमाणात घरे बांधली जात आहेत. या भागात पायाभूत सुविधाही चांगल्या आहेत त्यामुळे भविष्यातील मुंबईची वाढ या भागातच अधिक होणार आहे. येथे आज अनेक घरे बांधून तयार आहेत व आणखी नवी घरेही उभारली जात आहेत. परिणामी घरांच्या किमतीत घट होऊ लागली आहे.

Leave a Comment