अमेरिकेच्या अनेक शहरांत दंगलीचे लोण पसरले

riot
न्यूयार्क – फर्गसन येथे १८ वर्षीय मायकेल ब्राऊन या काळ्या तरूणाने दुकानातून जबरदस्तीने सिगरेट उचलल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी गोळी घातल्याचा व त्या संदर्भात या गोर्‍या अधिकार्‍यांविरोधात दावा दाखल करण्यास अमेरिकी ग्रँड ज्युरीनी नकार दिल्याचा परिणाम अन्य शहरांत वांशिक दंगल उसळण्यात झाला आहे. फर्गसन मधील दंगलीचे हे लोण आता शिकागो, न्यूयार्क, सिएटल, लॉस एंजेलिस, ऑकलंड, वॉशिग्टन डीसी या शहरांतही पोहोचले आहे. या शहरांच्या रस्त्यांवर निदर्शक मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांनी रस्त्यावरील अनेक वाहनांची तसेच पोलिस गाड्यांची जाळपोळ केली आहे. शहरातील कांही इमारतींनाही आगी लावल्या आहेत.

निदर्शकांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला आहे तर कांही ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. पोलिसांनी या संदर्भात ६१ जणांना अटक केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी न्यायालयाचा निर्णय जनतेने स्वीकारावा असे आवाहन केले असून शांतता पाळण्याचे आवाहनही केले आहे. ओबामा म्हणाले की पोलिसांनी गोळी घातल्यामुळे मायकेलचा जीव गेला आणि त्यामुळे होणारा आक्रोश स्वाभाविक आहे. मात्र त्याला हिंसाचार हे उत्तर नाही. पोलिस कायद्यात बदल गरजेचा आहे कारण या कायद्यावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही.मात्र शांतता राखूनच यातून मार्ग काढता येणार आहे.

Leave a Comment