सहारा कार्यालयावर आयकर विभागाची धाड- १३५ कोटींची रोकड जप्त

sahara
मुंबई – सहारा समुहाच्या दोन कार्यालयांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत १३५ कोटी रूपयांची रोकड व सुमारे १ कोटी रूपयांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याचे समजते. करचुकवेगिरीच्या संशयावरून आणि सहारा कार्यालयात प्रचंड मोठी बेहिशेबी रक्कम असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले. जप्त करण्यात आलेली रक्कम दिल्लीतील सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखेत जमा करण्यात आली आहे. या संबंधीचा अहवाल काळ्या पैशांसंदर्भात काम करत असलेल्या विशेष तपास गटाकडे पाठविला गेला आहे असेही सांगण्यात आले.

सहारा समुहाच्या प्रवक्त्याने मात्र छाप्यात सापडलेली रक्कम पूर्णपणे वैध कमाईची असल्याचे स्पष्ट केले आहे. हा प्रवक्ता म्हणाला की गतवर्षीपासून आमच्या मालमत्ता आणि आमची अकौंट गोठविली गेली आहेत. सर्व अकौंटची माहिती सेबीकडे आहे आणि कधी कोणते खाते सेबी सील करेल हे सांगणे अवघड असल्याने बँकेतून मोठ्या रकमा काढण्यास आाम्हाला अडचणी येत आहेत. कंपनीच्या कोणत्याही क्षेत्रात कधीही पैशांची गरज लागू शकते म्हणून कांही कार्यालयात रोख रकमा ठेवल्या जात आहेत. हा काळा पैसा नाही.

आयकर विभागाने छाप्यात जप्त केलेल्या रकमेबाबत आणि दागदागिन्याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी नोटीस सहाराला बजावली असून मुंबई झोनल ऑफिसतर्फे फौजदारी केस दाखल केली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment