कथक नृत्यांगना पद्मश्री सितारादेवी कालवश

sitaradevi
मुंबई – कथक नृत्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या नृत्यांगना सितारादेवी यांचे मंगळवारी पहाटे जसलोक रूग्णालयात निधन झाले. गेले कांही दिवस त्या रूग्णालयातच उपचार घेत होत्या आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यापूर्वीही त्यांच्यावर कुलाबा हिल हॉस्पिटल व हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार केले गेले होते.

सितारादेवी यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरविले होते तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी अॅवार्ड, कालिदास पुरस्कार अशा सन्मानांनीही गौरविण्यात आले होते. नृत्यक्षेत्रातील सेवेबद्दल भारत सरकारने जाहीर केलेला पद्मभूषण पुरस्कार त्यांनी नृत्यक्षेत्रात अजून खूप काम करण्याचे बाकी असल्याचे सांगून नाकारला होता. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच कथक शिकलेल्या सितारादेवींनी बॉलीवूडमध्ये जशी या नृत्याला प्रतिष्ठा मिळवून दिली तशीच जागतिक पातळीवरही या नृत्याला शास्त्रीय नृत्याचा दर्जा मिळवून दिला.

सितारादेवी यांचे वडील सुखदेव महाराज हे संस्कृत पंडित होते. त्यांना कथकची आवड होती आणि आपल्या पाची मुलांकडे त्यांनी ही कला दिली. मात्र त्याकाळी कथकला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे कोलकाता सोडून ते वाराणसीला आले होते. तेथेच सितारादेवी यांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव होते धनलक्ष्मी. सितारादेवींनी नृत्याचे धडे सर्वप्रथम आपली मोठी बहीण तारा हिच्याकडे गिरविले व त्यानंतर अच्चन महाराज, शंभू महाराज, लच्छू महाराज यांच्याकडे नृत्याची तालिम घेतली होती. रविद्रनाथ टागोर, सरोजिनीदेवी नायडू यांच्यासमोर त्यांनी आपला पहिला सोलो कार्यक्रम केला होता.

सितारादेवी यांनी अनेक हिंदी चित्रपटातूनही भूमिका केल्या होत्या. १९४३ साली आलेल्या वतन या चित्रपटात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. मदर इंडिया चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. मात्र नंतर त्यांनी आपले सर्व लक्ष नृत्यावरच केंद्रीत केले होते. लंडनच्या अल्बर्ट हॉल, व्हिक्टोरिया हॉल व न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध कार्नेजी हॉल येथे त्यांचे कार्यक्रम झाले होते.

Leave a Comment