अवामी लीग पक्षाच्या माजी नेत्याला फाशीची शिक्षा

mubarak
ढाका – बांगलादेशमधील अवामी लीग पक्षाचे माजी नेते मुबारक हुसेन (वय ६४) यांना आज येथील विशेष लवादाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १९७१ ला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात ३३ सामान्य नागरिकांचा बळी घेतल्याबद्दल आणि युद्धगुन्हा केल्याबद्दल त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांना सत्ताधारी अवामी लीग पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मुबारक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या पाच आरोपांपैकी दोन आरोपांमध्ये ते दोषी आढळल्याचे लवादाने म्हटले आहे. २२ ऑगस्ट १९७१ ला ३३ नागरिकांची हत्या केल्याबद्दल त्यांना फाशी, तर युद्धकाळात खून, अपहरण, लूटमारी या आरोपांखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. युद्धकाळात पाकिस्तानने तयार केलेल्या रझाकारांच्या एका गटाचे मुबारक हुसेन हे प्रमुख होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध असणार्या, जमात ए इस्लामी या मूलतत्त्ववादी गटाशी ते संबंधित होते. मात्र, पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी अवामी लीगमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी युद्धकाळात केलेले गुन्हे उघड झाल्यानंतर पक्षाने दोन वर्षांपूर्वी त्यांना निलंबित केले होते.

Leave a Comment