माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे निधन

murli-deora
मुंबई – माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे मुंबईत सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेले कांही दिवस ते आजारी होते. आज दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यविधीसाठी काँग्रेसमधील नेते तसेच अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.खासदार मिलींद देवरा हे मुरली देवरा यांचे पुत्र आहेत.

मनमोहनसिंग सरकारात मुरली देवरा पेट्रोलियम अणि नॅचरल गॅस मंत्री होते. त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते.दीर्घकाळ राजकारण सक्रीय असलेल्या देवरा यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली होती. १९६८ ते ७७ या काळात ते मुंबईचे कौन्सिलर होते तर ७७-७८ या काळात महापौर होते. दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक त्यांनी प्रथम १९८० सालात लढविली होती मात्र त्यावेळी त्यांना पराजय स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र चार वेळा ते याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

व्यवसायाने उद्योगपती असलेले देवरा एप्रिल २००२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. मृदूभाषी असलेले देवरा यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीचे अध्यक्षपद २२ वर्षे भूषविले होते.

Leave a Comment