बेकायदेशीर चमकोगिरीला बसणार चाप

high-court
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्या चमकेश लोकांवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी वकिलांची फौज उभी केली असून यासाठी लवकरच २३ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा चमकेश लोकांवर बेकायदेशीर फ्लेक्स लावल्यास खटले भरण्याचे आदेश देखील दिले आहेत.

यापूर्वी बेकायदेशीर फ्लेक्सवरील नेते, अशी बॅनर लावणारे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र चमकोगिरी करणाऱ्यांनी या आदेशाला बगल देत पळवाट शोधली होती. राजकीय पक्षांनी फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचेच फोटो असलेले फ्लेक्स लावण्याची युक्ती शोधून काढली होती. मात्र आता न्यायालयाने त्यालाही चाप लावण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

बेकायदेशीर फ्लेक्सवर फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो असतील तर कारवाई करता येईल का? यांवर न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट करत संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन, चौकशी करावी आणि अचूक गुन्हेगाराला शोधून काढावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासाठी न्यायालय अनधिकृत बॅनरवर लक्ष ठेण्सासाठी प्राथमिक स्वरुपात २३ विविध ठिकाणी २३ प्रतिनिधी वकीलांची नेमणूक करणार आहे.

याबाबत मनसेने बेकायदेशीर फ्लेक्स लावणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले असून या प्रतिज्ञापत्राच न्यायालयाने स्वागत केले आहे आणि अशाच पद्धतीने इतर पक्षांनीही न्यायालयाचे आदेश पाळावेत असे निर्देश दिले आहेत. यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीने अनधिकृत बॅनर न लावण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले आहे.

Leave a Comment