बीसीसीआयची सर्वोच्च न्यायालयाने केली कानउघडणी

supreme-court
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयला तुम्ही जर स्पॉट फिक्सिंग किंवा मॅचफिक्सिंगसारखे प्रकार घडू दिलेत तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या हातांनी क्रिकेटची हत्या करत आहात, असे सांगत कानउघडणी केली असून खिलाडूवृत्तीनेच क्रिकेट हे खेळले जावे आणि सभ्य गृहस्थांचा खेळ ही त्याची मूळ ओळख कायम राहावी, अशी अपेक्षाही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्याविरोधात एकाच वेळी गुन्हेगारी स्वरुपाची आणि प्रशासकीय कारवाई होऊ शकते का, असा प्रश्न बीसीसीआयला विचारला आहे. या मुद्यावर खुलासा करताना बीसीसीआयच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात बीसीसीआयचे प्रत्येक पाऊल हे नियमांना धरून असेल. तसेच मुदगल समितीच्या अहवालातल्या निष्कर्षांवरून निर्णय घेण्यासाठी बीसीसीआय एका समितीची स्थापना करेल आणि त्या समितीत श्रीनिवासन यांचा समावेश नसेल, असेही आश्वासन बीसीसीआयच्या वतीने देण्यात आले.

Leave a Comment