हिंदू मंदिराची पाकिस्तानमध्ये तोडफोड

hindu-temple
इस्लामाबाद – काही अज्ञात समाजकंटकांनी पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे.

सिंध प्रांतातील हैदराबादच्या तांडो मोहम्मद या जिल्ह्यात असलेल्या हिंदू मंदिरात कंटकांनी धार्मिक पुस्तकांची जाळपोळ, मंदिराच्या वास्तूसह मूर्तींची तोडफोड करून आग लावली. घटनेच्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराला आग लावून चार जण दुचाकीवर स्वार होऊन पळून गेलेे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, स्थानिकांच्या माहितीनुसार आरोपींच्या तपासाची मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, पोलिस अधिकार्‍यांनी या ठिकाणी मंदिर नव्हतेच असा दावा केला आहे. एका सिमेंटच्या उंचवट्यावर काही मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्याला मंदिर म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. पाकमधील हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नसून याचवर्षी २८ मार्च रोजी हैदराबाद येथेच एका मंदिराला आग लावण्यात आली होती. त्याही वेळी पाकिस्तानी हिंदू समुदायाने जोरदार निदर्शने केली होती.

Leave a Comment