नारायण राणे यांचा शिवसेनेवर प्रहार

rane
सिंधुदुर्ग – आपले आमदार जर आपण भाजप सरकारमध्ये सहभागी झालो नाही तर फुटतील आणि पक्षातही फूट पडेल, या भीतीने शिवसेना आता लाचार झाली आहे. पक्षाला मोठ्या फुटीपासून वाचविण्यासाठी भाजपपुढे नमते घेण्याशिवाय शिवसेनेला दुसरा पर्याय नाही, असा प्रहार कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी केला आहे.

तमाम शिवसैनिकांना स्वाभिमानाची शिकवण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. पण, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी स्वाभिमान सोडून लाचारी पत्करली, असा आरोप राणे यांनी कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना केला.

शिवसेनेला कोकणी माणसाने सत्ता सोपविली. पण, शिवसेनेने कोकणला काय दिले, असा सवाल राणे यांनी यावेळी केला. कोकणात येणार्‍या उद्योगांना शिवसेना विरोध करीत असते. शिवसेनेला ताकद देणार्‍या कोकणी माणसाचीच या पक्षाने फसवणूक केली, असेही राणे म्हणाले.

महाराष्ट्रात विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेणारी शिवसेना केंद्रातील सत्तेत का कायम आहे, या पक्षाची ही भूमिका दुटप्पी नाही का, असे सांगतानाच, उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकारण उदरनिर्वाहाचे साधन आहे. सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना दुसर्‍यांना काय देणार, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेला मंत्रिपद हवे आहे. मात्र, या पक्षातील कुणामध्येही मंत्रिपदाची गुणवत्ता नाही, अशी टीकाही त्यांनी केली. कोकणातील लोकांचे प्रेम असेपर्यंत कोकणच्या राजकारणात सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment