बीसीसीआयचा वार्षिक क्रीडा पुरस्कार संपन्न

bcci
मुंबई – निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने आजी-माजी क्रिकेटपटूंच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आले. बीसीसीआयच्या वार्षिक क्रीडा पुरस्कार विजेत्यांमध्ये मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार, महाराष्ट्राचा केदार जाधव, महाराष्ट्राची स्मृती मंढाना, हिमाचल प्रदेशचा ऋषी धवन, जम्मू आणि काश्मिरचा ऑफस्पिनर परवेझ रसूलचा समावेश आहे.

बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यांच्या हस्ते निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी वेंगसरकर यांनी बीसीसीआयसह राजा शिवाजी विद्यालय, पोदार कॉलेज, मुंबई विद्यापीठ, दादर युनियन क्लब, बीसीसीआयचे माजी संयुक्त सचिव प्रा. चंदगडकर तसेच सर्व संघसहका-यांचे आभार मानले. ऑस्ट्रेलिया दौ-यावर जाणा-या भारताच्या संघालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

बीसीसीआयच्या वार्षिक (२०१३-१४) पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी पॉली उम्रीगर पुरस्कार युवा मध्यमगती भुवनेश्वर कुमारने पटकावला. या पुरस्काराबद्दल २४ वर्षीय भुवनेश्वरने आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे मला भविष्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल, असे तो म्हणाला.

पुरस्कार आणि विजेते क्रिकेटपटू
१. पॉली उम्रीगर पुरस्कार (आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी) – भुवनेश्वर कुमार
२. लाला अमरनाथ पुरस्कार (रणजीमध्ये अष्टपैलू कामगिरी) – परवेझ रसूल
३. लाला अमरनाथ पुरस्कार (देशांतर्गत मर्यादित षटकांच्या सामन्यांत अष्टपैलू कामगिरी) – आर. विनय कुमार
४. माधवराव शिंदे पुरस्कार (रणजीमध्ये सर्वाधिक धावा) – केदार जाधव
५. एम. ए. चिदंबरम पुरस्कार (२५ वर्षाखालील सर्वोत्कृष्ट) – राहुल त्रिपाठी
६. एम. ए. चिदंबरम पुरस्कार (१९ वर्षाखालील सर्वोत्कृष्ट) -बी. अनिरुद्ध
७. एम. ए. चिदंबरम पुरस्कार (१६ वर्षाखालील सर्वोत्कृष्ट) – शुभम गिल
८. एम. ए. चिदंबरम पुरस्कार (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) – स्मृती मंढाना
९. देशांतर्गत सर्वोत्कृष्ट अंपायर – अनिल चौधरी

Leave a Comment