कोलंबो – श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी २०१५मध्ये आठ जानेवारी रोजी अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार असल्याची माहिती दिली.
श्रीलंकेत आठ जानेवारीला होणार निवडणुका
गुरुवारी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा विद्यमान अध्यक्ष महेंद्रा राजपक्षे यांनी केली होती. राजपक्षे यांची अध्यक्षपदाची मुदत २०१६मध्ये संपणार आहे. मात्र त्याच्या दोन वर्षे आधीच त्यांनी निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, निवडणुका जाहीर झाल्यानंतर श्रीलंकेच्या राजकारणातील घडामोडींना प्रचंड वेग आला.
राजपक्षे यांना त्याच्याच पक्षातून अध्यक्षपदासाठी आव्हान देण्यात आले आहे. देशाचे आरोग्य मंत्री मैत्रीपाल सिरिसेना यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिरिसेना यांची बंडखोरी राजपक्षे यांच्यासाठी मोठा धक्का मानले जात आहे. सलग तिस-यांदा अध्यक्ष होण्याची इच्छा असलेल्या राजपक्षे यांना या बंडखोरीमुळे निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.