मुंबई – बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येची सुपारी देण्यात आलेल्या दोघा जणांना मुंब्रा येथील डोंगरात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असे गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट झाले आहे. खार पश्चिीमेला मधू पार्क येथे राहणारे महेश भट, त्यांचा भाऊ किंवा जवळच्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्याच्या तयारीत असलेल्या रवी पुजारी टोळीच्या तेरा सदस्यांना गुन्हे शाखेच्या मोटरवाहन चोरीविरोधी पथकाने अटक केली. या टोळीतील बहुसंख्य तरुण कोणतीही गुन्हेगारी पार्श्वनभूमी नसलेले आहेत. या तरुणांपैकी असिफ सत्तार ऊर्फ बॉस आणि अशफाक बचकाना या दोघांची भट यांच्यावर गोळीबार करण्यासाठी निवड करण्यात आली. या दोघांनाही शस्त्र चालवण्याचा कोणताच अनुभव नसल्यामुळे त्यांना या कटाचा सूत्रधार असलेला इशरत शेख ऊर्फ राजा आणि मोहम्मद अनिस अब्दुल रशीद मर्चंट या दोघांनी मुंब्रा येथील डोंगरात प्रशिक्षण दिले.