कोलकाता – कोलकाता टॅक्सी क्षेत्रात गेली अनेक दशके अधिराज्य गाजविलेल्या अँबेसिडर गाड्यांचे उत्पादन बंद झाल्यामुळे या क्षेत्रावर कब्जा मिळविण्यासाठी टाटा, मारूती आणि फियाट या कंपन्यांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. सध्या टाटाच्या इंडिगो आणि मारूतीच्या डिझायर या गाड्या टॅक्सी मार्केटमध्ये दाखल झाल्या असून फियाट त्यांची लिनिया या बाजारात उतरविण्याच्या प्रयत्नात आहे. या गाडीसाठी सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे फियाट क्रिसलर ऑटो. इंडिया ऑपरेटिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नागेश बसवंतहळ्ळी यांनी सांगितले.
कोलकाता टॅक्सी मार्केटवर टाटा, मारूती, फियाटची नजर
नागेश म्हणाले की त्यांच्या मल्टीपरपझ अॅव्हेंच्युराचे मॉडेल दिल्ली व मुंबई टॅक्सी बाजारात विकले जात आहे आणि कोलकातासाठी ते लिनिया मॉडेल बाजारात आणत आहेत. कोलकाता कार डिलरशीप कंपनी ऑस्टीनचे संजय पटोडिया म्हणाले की ते आजपर्यंत अँबेसिडरचे डिलर होते आता फियाटसाठी काम करणार आहेत. सरकारकडून फियाट टॅकसीसाठी लवकरच परवाना दिला जाईल असेही ते म्हणाले.
मारूतीची डिझायर आणि टाटा मोटर्सची इंडिगो कोलकाता टॅक्सी बाजारात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. त्यांनी बाजाराचा बराच मोठा शेअरची मिळविला आहे. कोलकाता वाहतूक विभाग ३ हजार नवीन टॅक्सी परवाने देणार आहे त्यात हिस्सा मिळविण्यासाठी फियाट प्रयत्नशील आहे.