‘चँपियन्स’ला झाला अर्धागवायू

michale
जिनेव्हा – गेल्या वर्षी २९ डिसेंबरला फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगांमध्ये स्कीइंग (बर्फावरील स्केटिंग) करताना मायकल शुमाकर गंभीर जखमी झाला. मेंदूला जबर दुखापत झाल्याने तो कोमात गेला. शुमाकरवर स्वित्झर्लंडलडमधील लॉसेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वैद्यकीय कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला त्याच्या राहत्या घरी (लेन जिनेव्हा) पाठवण्यात आले. पण आता कोमातून बाहेर आलेला महान फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकरच्या प्रकृतीबाबत अद्याप सर्वाना उत्सुकता आहे. त्याची प्रकृती सुधारत असली तरी व्हीलचेअर बसून राहणा-या या ‘चँपियन्स’ला अर्धागवायू झाला असून तो बोलतही नाही. शुमाकरची स्मृतीही गेली आहे, अशी माहिती शुमारकचे मित्र आणि माजी रेसिंग ड्रायव्हर फिलिप स्ट्रीफ यांनी दिली आहे. स्ट्रीफ यांच्या माहितीमुळे शुमाकरचे चाहते कमालीचे धास्तावलेत. ‘‘दिवसागणिक शुमाकरच्या प्रकृतीत सुधारणा आहे. मात्र तो बोलत नाही. माझ्याप्रमाणे व्हीलचेअरवर बसून असतो. त्यालाही अर्धागवायू झाला असावा, असे मला वाटते. शुमाकरला बोलायलाही होत नाही. त्याला अनेक गोष्टी आठवत नाहीत. त्यामुळे त्याची स्मृती गेल्यासारखी वाटते,’’ असे स्ट्रीफ यांनी बुधवारी ‘डेली मेल’ला सांगितले. स्वत: स्ट्रीफ यांनाही व्हीलचेअरवर बसून आपली सर्व कामे करावी लागत आहेत. १९८९ मध्ये ब्राझीलमध्ये मोसमपूर्व चाचणीवेळी झालेल्या अपघातात स्ट्रीफ गंभीर जखमी झाले होते.

Leave a Comment