अमेरिका गोठली – सात जणांचा मृत्यू

snowfall
न्यूयॉर्क – अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या पश्चिम भागात बर्फाच्या वादळाचे थैमान आजही सुरू राहण्याची शक्यता तेथील वेधशाळेने वर्तविली असून या भागात बर्फवृष्टीमुळे बर्फाचा सहा ते पंधरा फुटांपर्यंत थर साचला आहे. येथे तासाला तीन ते पाच फूट वेगाने बर्फ कोसळत आहे. यामुळे नागरिकांना घरातच कैदेत पडण्याची वेळ आली असून आत्तापर्यंत चार जणांचा हृदयाचा झटका आल्याने व उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाला आहे. ठिकाठिकाणी आणखी तीन नागरिकांचे मृतदेह मिळाले आहेत.

रस्त्यावर प्रचंड बर्फ असल्याने वाहतूक ठप्प आहे. एरिक कौंटीमध्ये ४६ वर्षीय नागरिकाचे प्रेत गाडीतच सापडले आहे. त्याची गाडी १५ फूट बर्फाखाली दबली गेली होती. कांही भागात रेल्वेसेवाही बंद करण्यात आली असून न्यूयॉर्कच्या वादळग्रस्त भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अनेक वाहने रस्त्यातच अडकून पडली आहेत. बफार्चा वर्षाव सुरूच असल्याने रस्त्यातील बर्फ काढणे अवघड बनले आहे तसेच मदतकार्य सुरू करणेही अवघड बनले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment