महिला सरपंचाचा विनयभंग करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

sarpanch
अहमदनगर – प्रसारमाध्यमांनी गटेवाडी प्रकरण लावून धरल्यानंतर पोलिसांनी महिला सरपंचाचा विनयभंग करणाऱ्या आरोपी भरत गट याला अटक केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून दरदिवशी धक्कादायक प्रकार उजेडात येत असून गेल्या मंगळवारी पारनेर तालुक्यातल्या गटेवाडी ग्रामपंचायतीत निर्लज्जपणाचा कळस गाठणारी घटना घडली. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतच एका ग्रामपंचायत सदस्याने महिला सरपंचाला मारहाण करुन विनयभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला.

गेल्या मंगळवारी ग्रामसभेत आरोग्य विषयावर महिला सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या उपस्थितीत चर्चा सुरु होती. याचवेळी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य भरत गट याने सरपंचाच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडत त्यांना मारहाण केली.

अचानक घडलेल्या या साऱ्या प्रकारानंतर उपस्थित महिला सदस्यही बिथरल्या. दुःशासनालाही लाजवेल असा प्रकार केल्यानंतर सूपा पोलिसांनी भरत गटला अटक केली खरी. मात्र त्यानंतर तो जामीनावर सुटला. महत्वाचे म्हणजे या भरत गटवर इतरही गुन्हे दाखल आहेत. मात्र पोलिस त्याला पाठिशी घालत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Comment